परवा मॉल मध्ये शाळेतला मित्र भेटला होता.
इतक्या दिवसांनी भेटलो, कुठे असतोस, कसा आहेस वैगेरे बोलून झालं.
मग जरा काय काम करतोयस, घर कुठे आहे, अजून घर घेतलं नाही का? लग्न झालंय मग लेकरू नाही का? अशी सगळी विचारणा सुरू झाली.
पुढे मात्र एका एका गोष्टीने ईर्षा वाढायला लागली. ज्या मित्राला भेटून 5 मिनिटांपूर्वी आनंद झाला होता त्याचं वैभव आणि सौख्य पाहून जळफळाट व्हायला लागला.
मी ज्या मॉल मध्ये स्वस्तात मिळतो म्हणून किराणा खरेदी करायला
आलो होतो तिथे हा सहज casual शॉपिंग करायला आला होता. त्याचा पेहराव पाहून अजून लाजायला होत होतं. त्याचं महागडं पण क्लासिक घड्याळ
त्याची वेळ किती चांगली हे दाखवून देत होतं.
त्याच्या प्रत्येक सुखाची मी नकळत स्वतः च्या आयुष्याशी तुलना करू लागलो हळूहळू त्याच्या सुखाचं पारडं जड व्हायला लागलं. मी आयुष्यात जास्त काही साध्य
करू शकलो नाही हेच जाणवत राहिलं
सुरुवातीला झालेला अनपेक्षित भेटीचा आनंद मावळायला लागला आणि तिथून लवकर काढता पाय घेण्यासाठी
संधी शोधू लागलो कसा बसा तिथून निघालो पण जाताजाता एक विचार मनात तरळून गेला एकाच क्लास
मध्ये असणारे आम्ही आज मात्र वेगळया वेगळया क्लास मध्ये मोडत होतो.

Comments
Post a Comment