झुकायचं कुणी?

नात्यात झुकतं कुणी घ्यायचं?

बर्‍याचदा नवरा बायको च्या नात्यात हा प्रश्न पडतो की झुकायचं कुणी?

खरंतर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की ज्याला नातं टिकवायचं आहे त्याने झुकतं घ्यावं

पण हे वाटतं तितकं सोपं नाही

अनेकदा माघार घेण्याचा अर्थ असा लावला जातो की  चूक समोरच्याची नसून माघार घेणाऱ्याची चूक आहे म्हणून तो माघार घेतो.

नात्यात भांडणाची कारणेही वेगळी वेगळी असतात.

एक जण नेहमी वेळेला गृहीत धरत असतो आणि दुसरा वेळ पाळत असतो.

एक जण जीवाच्या आकांताने काहीतरी समजावत असतो पण दुसर्‍याला जेव्हा जाणिव होते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

किंवा वेळ निघून गेली नसेल तरीही नातं अशा काठावर येऊन पोचतं की दुसर्‍या व्यक्तीचा सगळा रस उडून गेलेला असतो.

एक जण सत्याची कास धरून चालत असतो पण दुसरा जगरहाटीत खोटं बोलणं योग्य समजतो

एक जण कुठलाही हिशेब न लावता जगत असतो तर दुसर्‍याच्या डोक्यात कायम हिशोब फेर घालत असतो.

एक जण परोपकारी असतो तर दुसरा थोडा माणूस घाण्या स्वभावाचा असतो.

जेव्हा दोन वेगळया टोकाचे लोक एकमेकांबरोबर राहतात तेव्हा भांडण होणं स्वाभाविक आहे  पण या भांडणांमुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ नये म्हणून एकाने कायम झुकतं माप घेतलं तर ते नातं फार काळ टिकणे कठीण असते.

नात्याची गरज दोघांनाही तितकीच असायला हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचा स्वीकार असावा.

समोरच्या व्यक्तीच्या क्रिया प्रतिक्रिया आपल्या नाही तर त्याच्या स्वभावाप्रमाणे असणार आहेत हे आपल्याला कळायला हवं.

Comments