गणपती बाप्पा मोरया




मग काय झालं ढोल ताशे वाजले तर 
आसमंतात सनई चौघडे दुमदुमले तर 
सण आहे आपल्या बाप्पा चा
बुद्धीची देवता गणराया चा 
कोण कुठला म्हातारा विव्हळत होता 
ढोल ताशांच्या नावाने शंख करत होता 
दिवस किती उरलेत ह्याचे बोलतो बघा कसा 
पाणी द्या कुणीतरी कोरडा पडलाय त्याचा घसा 
ह्यांच्या वेळी नव्हते का हुल्लडबाजी करत 
की ह्यांची पिढी गेली प्राणांची बाजी लावत 
नवी पिढी आहे तर वेगळं काही करणार च ना 
तानाशाही विरुद्ध आम्हीही बंड पुकारणार च ना 
टिळकांनी सुरू केला गणेशोत्सव एकी वाढावी म्हणून 
आम्ही ढोल वाजवतो एरिया ची वट वाढावी म्हणून 
बारा महिने कुठे असतात ध्वनी प्रदूषण वाले विद्वान?
गणपती, अन दिवाळीलाच बरे काम करतात यांचे कान ? 

कर्ता करविता कोण शोध लावा लवकर 
आणि मागच्या वेळेपेक्षा मोठा आणा स्पीकर  
महिना महिना तालीम करायची याला काय अर्थ आहे 
आमचे नेहरू शर्ट, नऊवारी सगळं काय व्यर्थ आहे?
मग काय झालं शेजारच्या ताईंचा
 सोनू तापाने फणफणला
बडे बडे देशो मे छोटी बाते होती है
 असं शाहरुख च तर म्हणला 
आता प्रत्यक्ष गणराया आला तरी आम्ही ऐकणार नाही 
ये गणेशोत्सव हमारा है इथे कोणाची चालणार नाही 
घ्या रे ढोल बडवायला फोडू सगळ्यांचे कान 
वाजत गाजतच बाप्पा  येईल  ह्यातच आपली शान

Comments