मित्रांनो काल मी एका दुकानात
खरेदीसाठी गेले होते. तिथे एक छोटी
मुलगी आपल्या आईसोबत आली.तिची आई खरेदी करत होती आणि त्या
छोट्याश्या मुलीला दुकानात एक मोठी बाहुली दिसली तिने कशाचा विचार न करता त्या
दिशेने पळायला सुरुवात केली आणि धप्पकन पडली हे पाहून तिथेच जवळ 2 मुलं उभी होती
ती मुद्दाम जोरात हसायला लागली. त्या मुलीला हे पाहून खूप
राग येत होता.
खरंतर घटना साधी होती पण यातून
शिकण्यासारखे खूप आहे.
1.आपल्या आजुबाजुला अशी काही माणसं असतात जी सतत आपल्यावर हसतात.
अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हे उत्तम.
2. आपण कुणावर हसताना तारतम्य
बाळगलं पाहिजे.
माझी आई म्हणायची की मस्करी अर्ध भांडण असतं.
बर्याचदा असं होतं की मित्रांचा, किंवा नातेवाईकांचा
एखादा चमू त्यांच्यातल्या एकाच व्यक्तीला टार्गेट करून करून फिरकी घेत असतो.
कधी ती मस्करी खूप शिगेला पोचते
आणि मग भांडण सुरू होतं.
एक तर निखळ विनोद समजून घेणे खूप
गरजेचे आहे. निखळ विनोद म्हणजे कुणावर
हसणे नाही. कुणालाही न दुखावता केलेला विनोद म्हणजे निखळ,
निरागस विनोद.
खरंतर हे सांगायची वेळ येऊ नये
पण कुणाच्या व्यंगावर हसू नये.
आपण कुणावर हसताना हा विचार
जरूर केला पाहिजे की आपण नेमके का हसतोय, आणि आपल्या बोलण्याने समोरच्याला त्रास होत आहे की समोरची व्यक्ति आपली मस्करी खेळाडू वृत्तीने घेत आहे.
विनोद 2 प्रकारचे असतात एक हवे
हवेसे वाटणारे आणि दुसरं नकोसे वाटणारे. आणि आपली मस्करी कुठल्या प्रकारात मोडते हे समोरच्याच्या डोळ्यात, हावभावांवरून दिसतं.
कुणावर विनोद करताना त्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे .
विनोदाच्या आड अपमान करणे टाळावे. बर्याचदा विनोदात समोरच्याला कमी लेखण्याचा प्रताप दाखवला जातो असे करणे योग्य नाही. लक्षात ठेवा, अश्या प्रकारे विनोद केल्याने समोरच्याचा मान कमी होवो अथवा न होवो पण आपल्या हीन बुद्धीचे प्रदर्शन होणे मात्र अटळ असते.

Comments
Post a Comment